
सोलापूर : जनगणना 2027 ही भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरविण्याची प्रक्रिया आहे. आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्व-गणनेस सुरुवात होत आहे. तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी स्व-गणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे शासकीय राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी विरोधी योद्धे, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व अन्य मान्यवर विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राने सन २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा मोठा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ४ लाख ८६ हजार लाभार्थ्यांना ९७ कोटी ३९ लाख रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक व समप्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100% टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी निधी मंजूर आहे. सदर निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे हाती घेता येतील. सोलापूर वासियांचे विमान सेवा सुरु करण्याचे अनेक दिवसाचे स्वप्न साकार झाले असून सध्या मुंबई, गोवा याठिकाणी विमानसेवा सुरु झाली असून नजीकच्या काळात तिरुपती हैद्राबाद व पुणे या सेवा सुरु होतील. सदर विमान सेवेमुळे सोलापूर मधील उद्योग व्यवसायास चालना मिळाली आहे. भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडींगची सुविधा सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर येथील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन IT पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. नवीन IT पार्कमुळे सोलापूरमधील उच्च शिक्षित युवकांना स्थानिक रोजगार मिळणार आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे सोलापूर शहरवासियांना नियमित, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी 1378 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. अयोध्या, काशी विश्वेश्वर, उज्जैन यासारखी धार्मिक स्थळे जशी विकसित होत आहेत, त्याधर्तीवर विठूरायाच्या पंढरी नगरीचा विकास व्हावा हीच भावना या आराखडयामध्ये आहे. जगतगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने स्वत:च्या मालकीची १५ एकर जागा उपलब्ध करुन दिली असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने १५० कोटी निधीचा आराखडा मंजुर केला असून त्यापैकी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.
आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री श्री गोरे यांनी अभिवादन केले. या सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर नागरिक यांची भेट घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत, वंदे मातरमचे गायन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. परेड कमांडर विशाल नवले यांच्या समवेत पालकमंत्री गोरे यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेत्या पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणेच क्रीडा, महिला बाल विकास व अन्य विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.















