
नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण, देवळा व मालेगाव या तालुक्यांत द्राक्ष, बेदाणे, डाळिंब, टोमॅटो आणि कांदा या निर्यातक्षम पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पिंपळगाव बसवंत हे या उत्पादन पट्ट्याच्या मध्यभागी असून द्राक्ष निर्यातदारांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या येथील शेतकरी व निर्यातदारांना किटकनाशक अवशेष तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते. पिंपळगाव बसवंत येथे कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र व उपलब्ध जागा असल्यामुळे प्रयोगशाळा उभारणीसाठी हे ठिकाण योग्य व सोयीचे असल्याचे श्री.भरणे यांनी सांगितले. तसेच निर्यातक्षम कृषी मालाच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा, आवश्यक मानांकन आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीत प्रस्तावित प्रयोगशाळेच्या उभारणीसंदर्भातील तांत्रिक बाबी, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, प्रशासकीय प्रक्रिया तसेच निधी उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार दिलीपराव बनकर उपस्थित होते.















