अहिल्यानगर : निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी त्वरित मार्गी लावण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच ‘पेन्शन अदालत’ पार पडली. या अदालतीला निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा झाल्याने उपस्थित ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला.
या पेन्शन अदालतीमध्ये निवृत्तीवेतन, सुधारित पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि थकबाकी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली प्रकरणे व सुधारित वेतननिश्चितीचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
सध्याच्या काळात घरबसल्या कामे होणे गरजेचे आहे, हे ओळखून या अदालतीमध्ये ‘ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र’ कसे सादर करावे. ‘डिजीलॉकर’ अॅपचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्रीमती अर्चना पै यांनी कर्जसुविधा व जीवन प्रमाणपत्र प्रक्रियेची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे बजरंग पाटील यांनी विविध सवलती समजावून सांगितल्या. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले यांनी सेवा-सुविधांबाबत थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले.
जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी बँक व निवृत्तीवेतनधारक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व पटवून दिले. अपर कोषागार अधिकारी कुशाबा पिसे यांनी ८० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणारे वाढीव लाभ व प्रशासकीय प्रक्रियेची माहिती दिली. यासोबतच श्री. भोपळे यांनी ज्येष्ठांच्या मनःस्वास्थ्यावर केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी मोलाचे ठरले. कोषागार विभागाच्या या तत्पर सेवेबद्दल निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर, प्रा. काळे व श्री. शितोळे यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे व सहायक संचालक रमेश कासार यांनी सर्वांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला महालेखापाल कार्यालयातील वरिष्ठ लेखा अधिकारी सुगंधी अनंथनारायणन, सुमथी गोपालन, दुय्यम लेखा अधिकारी रवी रंजन, लोकनाथ दत्ता, शुभम बोर्बन यांच्यासह अपर कोषागार अधिकारी रवींद्र काजळकर, सहाय्यक लेखा अधिकारी श्री. कुलकर्णी, उपलेखापाल रवींद्र शेटे व पेन्शनर्स संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#PensionAdalat#SeniorCitizensWelfare#AhilyanagarZP#TreasuryDepartment#PensionersRelief#GoodGovernance#DigitalLifeCertificate#AhmadnagarAdministration#SocialJustice#AdministrativeExcellence#पेन्शन_अदालत#निवृत्तीवेतनधारक#अहिल्यानगर_प्रशासन#जिल्हा_परिषद_अहिल्यानगर#ज्येष्ठ_नागरिक_कल्याण#प्रशासकीय_सुधारणा#जीवन_प्रमाणपत्र#जनहितार्थ_उपक्रम
















