
मुंबई: राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच ‘एसएनसीयू’मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालक डॉ .विजय कंदेवाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नवजात बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील विद्यमान परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.
बालकांच्या उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाशी योग्य कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.
राज्यातील बालआरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असा विश्वासही मंत्री आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केला.















