Home महाराष्ट्र जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री...

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

0
Construction of multi-purpose facilities including 'Vipassana Center' in Jalna district should be accelerated – Social Justice Minister Sanjay Shirsat

मुंबई: जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत.

मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जालना महानगरपालिका हददीमध्ये विपश्यना केंद्र उभारणी संदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार अर्जुन खोतकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूरदृश्य प्रणाली द्वारे जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा, जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या प्रकल्पामुळे जालना जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळेल. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत प्रस्तावित या प्रकल्पाचा उद्देश समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक उन्नतीला चालना देणे हा आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक अभ्यासिकांचे वातावरण, नागरिकांना सांस्कृतिक उपक्रमांसाठी व्यासपीठ आणि समाजाला आध्यात्मिक विकासासाठी विपश्यना व धम्म केंद्रांचा लाभ मिळणार आहे.

प्रस्तावित कामांची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. जमिनीची मोजणी, पाण्याची पातळी तपासणी आणि तांत्रिक अहवाल ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन महानगरपालिकेच्या नावावर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ करावी. आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे स्थानिक पातळीवर बैठका घेऊन या प्रकल्पाबाबतचा सातत्याने आढावा घेण्याचे निर्देशही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.