Home लाईफस्टाईल शैक्षणिक जिल्हा प्रशासनाचा ‘सुपर 50’ उपक्रम !

जिल्हा प्रशासनाचा ‘सुपर 50’ उपक्रम !

0
जिल्हा प्रशासनाचा ‘सुपर 50’ उपक्रम !
District Administration’s ‘Super 50’ Initiative!
  •  10वीच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई, नीट’चे मोफत प्रशिक्षण मिळणार
  •  जिल्हाधिकारी विकास मीना यांची संकल्पना
  •  अर्जासाठी 20 जूनपर्यंत मुदत
  • 25 जूनला निवड परीक्षा

यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘सुपर 50’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 50 निवडक विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांसाठी दोन वर्षांचे संपूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून यापूर्वी स्पर्धा परीक्षार्थींसाठी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सारख्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनासाठी युवा संवाद उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा हा ‘सुपर 50’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यामधून निधी उपलब्ध करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, निवास, भोजन आणि अभ्यास साहित्याचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षात 33 हजारांहून अधिक विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व वंचित घटकांतील असून, आर्थिक अडचणी आणि दर्जेदार मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी या  ‘सुपर 50’ उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

नागपूर, नांदेड, अकोलामध्ये प्रशिक्षण

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर, नांदेड किंवा अकोला येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये इयत्ता अकरावी व बारावी दरम्यान दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रवर्गनिहाय जागावाटप

या ‘सुपर 50’ उपक्रमात प्रवर्गनिहाय जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 20, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी 10 आणि खुला व ओबीसी प्रवर्गासाठी 10 जागा अशा एकूण 50 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पात्रता निकष

विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा. राज्य परीक्षा मंडळाच्या 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी परिक्षेत किमान 65% गुणांसह उत्तीर्ण असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जेईई किंवा एनईईटी (नीट) परीक्षेसाठी इच्छुक असावा. नागपूर, नांदेड, अकोला येथे संपूर्ण दोन वर्षे निवासी सुविधेत राहण्यास तयार असावा.

निवड परीक्षा अभ्यासक्रम

निवड चाचणी परीक्षा ही राज्य मंडळाच्या इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असून 100 गुणांची बहुपर्यायी परीक्षा असेल. परीक्षेत भौतिकशास्त्र (20 गुण), रसायनशास्त्र (20 गुण), गणित (25 गुण), जीवशास्त्र (20 गुण) व इंग्रजी (15 गुण) या विषयांचा समावेश असेल. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी राहील.

25 जूनला निवड परीक्षा

जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सुपर 50’ उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत गुगल फॅार्म व क्यूआर कोडद्वारे अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर पुढील संपर्क नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेलवर केला जाईल. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो. अंतिम निर्णय जिल्हास्तरीय समितीकडे असेल. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड परीक्षा 25 जून 2026 रोजी होणार आहे.

तीन समित्यांद्वारे अंमलबजावणी

या उपक्रमाच्या पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निविदा समिती, निवड समिती आणि नियंत्रण समिती अशा तीन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्या प्रशिक्षण संस्थांची निवड, विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणार आहेत. हा उपक्रम यशस्वी ठरल्यास महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठीही तो आदर्श मॉडेल ठरू शकतो, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोट

“यवतमाळ जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्याला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य साधने, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असून ‘सुपर 50’ उपक्रमाच्या माध्यमातून ती जबाबदारी पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे.”

— विकास मीना

जिल्हाधिकारी, यवतमाळ

गुगल फॅार्म लिंक :

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScYWlbC0_KXWW3Pw33Gy-r2jF65a254U11EQ5m9f1QreQDbWw/viewform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here