Home महाराष्ट्र भूजल संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

भूजल संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

0
Everyone should take initiative for groundwater conservation - Resident Deputy Collector Dadasaheb Gite

अहिल्यानगर :- हवामानातील बदल व भूजलाचा वाढता उपसा लक्षात घेता जलस्रोतांचे संरक्षण व भूजल संवर्धनासाठी शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी समन्वयाने पुढाकार घ्यावा. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले.

केंद्रीय भूजल विभाग (पुणे) यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे मंगळवारी (दि. १७) “केंद्रीय भूजल विभागाचे भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग” या विषयावर कार्यशाळेत श्री. गिते बोलत होते.

यावेळी विशेष अतिथी म्हणून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे, जलसाक्षरता केंद्र (यशदा) चे जिल्हा समन्वयक सुखदेव फुलारी व संतोष दहिफळे उपस्थित होते.

श्री. गिते म्हणाले , भूजल ही मर्यादित व अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचा वैज्ञानिक व नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे आहे. सर्व संबंधित विभागांनी केंद्रीय भूजल विभाग आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या भूजल डेटाबेसचा वापर करून सुसंवादी आणि व्यापक धोरण अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यशाळेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. प्रभावी भूजल व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करत, केंद्रीय भूजल विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या तांत्रिक माहितीचा स्थानिक स्तरावर नियोजन आणि विकासासाठी प्रभावी वापर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यशाळेत वरिष्ठ भूजलवैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी ‘राष्ट्रीय माहिती प्रसारण धोरण २०१८’ वर सादरीकरण केले. तसेच त्यांनी CGWB डेटा पोर्टल, INGRES, आणि WRIS प्रणालीचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दिले. माहिती प्रसारणासंदर्भातील सुसंवादाने क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्यास कशी मदत होते, यावर त्यांनी भर दिला.

कनिष्ठ भूजल वैज्ञानिक व्ही. हेमलता यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठीच्या ‘राष्ट्रीय एक्विफर मॅपिंग’ प्रकल्पाचे निष्कर्ष सादर केले.

वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी मार्गदर्शन करताना, जिल्ह्यातील विविध विभागांनी या तांत्रिक संसाधनांचा जिल्हास्तरीय नियोजन व विशेषतः गावातील जलसुरक्षा योजनांच्या तयारीत सक्रियपणे वापर करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनाची हमी दिली.

या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते ‘कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा’ या कॉफी टेबल पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले व उपस्थितांना त्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा, मृदा व जलसंधारण, लघू सिंचन, वन, कृषी, महिला व बालविकास विभाग यांसह विविध शासकीय विभाग आणि खासगी जल -‌ पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी केले.

#महाराष्ट्रशासन#GovernmentOfMaharashtra#GroundwaterManagement#WaterConservation#AhilyanagarNews#SaveWater#DadasahebGite#CentralGroundWaterBoard#AquiferMapping#SustainableDevelopment#WaterSecurity#SuccessStories#JalShakti#RuralDevelopment#भूजल_संवर्धन