Home नंदुरबार जिल्हा वडील आईला करायचे मारहाण, मुलाने रागाच्या भरात थेट बापाचा जीव घेतला अन्...

वडील आईला करायचे मारहाण, मुलाने रागाच्या भरात थेट बापाचा जीव घेतला अन् नंतर…; नंदुरबारमध्ये खळबळ

1
Father used to beat his mother, son took his father's life in anger and then...; There was a stir in Nandurbar

आई-वडिलांमधील सततच्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचलत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांकडून आईला होणारी मारहाण असह्य झाल्याने मुलाने काकाच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला. ही घटना धडगाव तालुक्यातील वेलखेडीच्या खेडीबारपाडा येथे घडली. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मयत किसन वेस्ता वळवी (वय 35) हा दारूच्या आहारी गेलेला होता. तो नेहमीच मद्यप्राशन करून घरी येत पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीवर होणारा हा छळ रोजचाच झाला होता. त्यामुळे मुलगा दिनेश किसन वळवी आणि शेजारी राहणारा त्याचा भाऊ सायसिंग वेस्ता वळवी हे दोघेही मानसिक तणावात होते. त्यांनी अनेक वेळा किसन वळवी यांना समज देण्याचा प्रयत्न केला. पत्नीला त्रास देऊ नये, असे वारंवार सांगूनही त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही.

वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

घटनेच्या रात्रीही किसन वळवी याने दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून मुलगा दिनेश याचा संयम सुटला. त्याने काका सायसिंग यांच्या मदतीने वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर दोघांनी मिळून लाकडी दांडक्याने किसन वळवी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. डोक्याला बसलेल्या गंभीर मारामुळे किसन वळवी यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह खोल दरीत फेकला

वडिलांचा मृत्यू झाल्याची बाब बाहेर येऊ नये आणि कोणताही पुरावा हाती लागू नये, या उद्देशाने आरोपींनी मृतदेह गावालगत असलेल्या पिंपळबार टेकडीवर नेला आणि तेथील खोल दरीत फेकून दिला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर मृताचा मोठा भाऊ खेत्या वेस्ता वळवी यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सायसिंग वेस्ता वळवी आणि दिनेश किसन वळवी (रा. वेलखेडीचा खेडीबारपाडा, ता. धडगाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.