Home शैक्षणिक विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन

12
Festival is important for developing the talents of students, says Additional Commissioner Dinkar Pawar

विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत गुण असतात. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अशा स्वरूपाचे महोत्सव विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभाग, नाशिक आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी केले. येथील विद्यावर्धिनी निवासी आश्रमशाळेत श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अजय परदेशी, प्रदेश सदस्य प्रा. पंकज पाठक, जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, नगरसेविका जयश्री महाले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, संजय पटेल, विलास डामरे, गौरव वाणी, निसारभाई मक्राणी, संजय वाणी, डॉ. स्वप्नील बैसाणे, संजीव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांनी कर्मण्य महोत्सवामागील भूमिका स्पष्ट करताना कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य पार पाडा, हा भगवंताचा उपदेश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे अध्ययन हे त्यांचे कर्म असून ज्ञानदान हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा या उद्देशाने दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत, यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात आमदार राजेश पाडवी यांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. खेलो इंडिया स्पर्धेत आदिवासी खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतात, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन झाले. कोठार व रांझणी येथील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे संघ स्पर्धांमध्ये सहभागी झाले. संध्याकाळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांचे संस्कृती व संस्कार या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण, निसारअली मक्राणी, सुनीता वाणी, आदित्य मालपुरे, सायली मालपुरे, जगन मराठे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.