वर्धा: प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या घराचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील प्रत्येक गरजू कुटूंबाना घरकुल उपलब्ध करुन देण्यासोबतच अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करीत असलेल्या जागेचे अतिक्रमण नियमानुकुल करुन पट्टे देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन येथे अतिक्रमण नियमानुकुल झालेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, तहसिलदार शकुंतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, सुकळीच्या सरपंच निलम जाधव, उपसरपंच प्रमोद तडस, लाभार्थी कौशल्याताई थुल आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व प्रमाणपत्राचा लाभ लाभार्थ्यांना थेट एकाच ठिकाणी मिळावा यासाठी वर्धा जिल्ह्यात प्रथमच सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी आता राज्यभर करण्यात येत आहे. सेवा पंधरवाडाचा एक भाग म्हणून लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करुन त्यांना पट्टे वाटप करण्यात येत आहे. पट्टे वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज केल्यास त्यांना घरकुल मंजूर करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. भोयर पुढे बोलतांना म्हणाले.
देशाची संस्कृती ज्या सणातून प्रतिबिंबीत होते, अशा मकरसंक्रातदिनी लाभार्थ्यांना हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. सेलू येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या तहसिल व कृषि कार्यालयातून विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी जागृत राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
गेल्या 44 वर्षांपासून अतिक्रमीत असलेल्या जागेचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे आता गावकऱ्यांना हक्काची जागा मिळाली असल्याचे सरपंच निलम जाधव म्हणाल्या. सुकळी स्टेशन येथे 33 लाभार्थी अतिक्रमीत जागेवर 30 ते 35 वर्षांपासून वास्तव्य करीत होते. या 33 लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करुन त्यांना पट्टे मंजूर करण्यात आले. यापैकी 12 लाभार्थ्यांना यापुर्वी राजस्व अभियानांतर्गत पट्टे देण्यात आले असून आज 21 लाभार्थ्यांना पट्याचे वितरण करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते सर्व 21 लाभार्थ्यांना शासकीय जमिनीच्या पट्टयांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन श्री. साटोणे यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















