Home नंदुरबार जिल्हा ‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे

0
Heat intensity increased due to 'El Nino'; citizens should remain vigilant

(नंदुरबार) ‘एल-निनो’च्या परिणामामुळे तापमानात वाढ होऊन उष्णतेची तीव्रता वाढल्याची पार्श्वभूमी असताना नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

ते आज पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या 67 वा स्थापना दिनाच्या मुख्य ध्वजवंदन समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगुणे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक आशित कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणपत गावीत, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, लेखाधिकारी संतोष पावले व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या एल-निनोमुळे जगभरात पावसात घट, तापमानात वाढ आणि शेती व जलस्रोतांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यात आपल्या जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद झाली असून सध्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांवर औषधांचा साठा उपलब्ध असून सार्वजनिक ठिकाणी पाणी व सावलीची व्यवस्था केली आहे. नागरिकांनीही उन्हापासून बचाव तसेच उपलब्ध पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेमार्फत ७२४ विहिरी प्रस्तावित करून टप्प्याटप्प्याने कामांना सुरुवात झाली आहे. ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणे वाटप, गाळपेरा, नदीकाठ लागवड व मुरघास प्रकल्प राबविले जात आहेत.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीतही गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी. भारत सरकारच्या जनगणना २०२७ साठी जिल्हा सज्ज असून मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना होणार आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देऊन सहभाग नोंदवावा.

पुढे बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पातून आदिवासी विकास, आरोग्य, शिक्षण, रस्ते व रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘बिरसा’ उपक्रम, डिजिटल आरोग्य व्यवस्था, ग्रामसडक योजना, सूक्ष्म उद्योग केंद्रे, ‘उमेद मॉल’ व हरित ऊर्जा उपक्रमांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल. जिल्हा वार्षिक योजनेतून “प्रकाश वाटा IIT-JEE-NEET” प्रशिक्षण व “आमची अभ्यासिका पुन्हा फुलले” अंतर्गत १२५ गावांत अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. तोरणमाळ फेस्टिव्हल व प्रकाशा येथे सिहस्थ पर्वणीसाठी सुविधा उभारल्या जात आहेत. आदिवासी उपयोजनेत मातृभाषेत सेवा देण्यासाठी बहुभाषिक उपकरण विकसित करण्यात आले आहे. आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये CCTV बसवून सुरक्षितता वाढवली असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहेत. आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.

महसूल विभागाने ९९.९७ टक्के सेवा वेळेत देऊन पारदर्शकता वाढवली आहे. ई-ऑफिसमुळे कामकाज गतिमान झाले असून ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’मध्ये ‘सेवांच्या हमी व सिकलसेल नियंत्रणासह जिल्ह्याने दुहेरी यश मिळवले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथे नवीन अपर तहसील कार्यालयांमुळे सेवा अधिक सुलभ होणार आहे. जिल्हा पोलीस दलाने ई-बीट पॅट्रोलिंग, ड्रोन, डायल ११२, ‘मिशन सक्षम’ व समुदाय पोलीसिंगद्वारे कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखली आहे. एकलव्य क्रीडा संकुलामुळे पोलीस दलाची तंदुरुस्ती व क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी १०९८ किंवा ११२ हेल्पलाईनवर माहिती द्यावी.

पुढे बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकासात प्रगती झाली असून जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व स्वच्छ भारत अभियानामुळे जीवनमान सुधारले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच आरोग्य पोषण निर्देशांक वाढीसाठी याहा मोगी आरोग्य पोषण मिशनची तर शिक्षण क्षेत्रात मुलभूत साक्षरतेचा निर्देशांक वाढविण्यासाठी मिशन गरुडझेप या शैक्षणिक अभियानाची सुरुवात आपण करतो आहोत. जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. एचपीव्ही लसीकरणाद्वारे मुलींचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.

जिल्ह्यातील सुमारे १.७५ लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. अ‍ॅग्रीस्टॅक व पीएम किसान अंतर्गत नोंदणी वाढली असून खरीपासाठी बियाणे व खतांचा साठा उपलब्ध आहे. भरारी पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या नाविण्यपूर्ण ‘अस्तित्व भिली एआय’ प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत आहे. पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासात तडजोड होणार नाही, याची मी ग्वाही देतो, असे सांगितले.

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांचा झाला सन्मान…

महसूल विभाग

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे. नायब तहसिलदार रमेश वळवी, निवडणूक नायब तहसिलदार भक्तराज सोनवणे, , ग्राम महसूल अधिकारी जयेश राऊळ, सहाय्यक महसूल अधिकारी, राहूल निकुंबे, रामदास पवार, महसूल सहाय्यक, संदीप शिंदे, जयप्रकाश पानपाटील, जगदीश मराठे, ग्राम महसूल अधिकारी गुलाब पाडवी, पोपट वाडेकर व शिपाई भटू भिल. यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

पोलीस विभाग

पोलीस निरिक्षक अजून पटले, भगवान धात्रक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदास सुपडू राठोड, संजय माळी, सुभाष तमखाने, यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

जिल्हा महिला व बाल विकास विभाग

श्रीमती दिपमाला प्रकाश पाटील, रुपये 10 हजार 01 चा धनादेश शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र.

जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय

कुणाल सुनील वीर, सन्मान चिन्ह व गौरव

आशा सेविका

संगिता पाडवी, अनिला जगदेव व श्रद्धा वाडीले यांना मोबदला रक्कमेचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनगणना-2027 पहिला टप्पा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक माधव कदम यांनी केले.