Home महाराष्ट्र आ. समीर कुणावार यांच्या हस्ते महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन संपन्न

आ. समीर कुणावार यांच्या हस्ते महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन संपन्न

1
Inauguration of Maharajswa Samadhan Camp by A. Sameer Kunawar

वर्धा: ग्रामीण भागातील महसुल विभागांशी संबंधीत दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी तत्पर निकाली काढणे तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी महसूल मंडळस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज दि.15 मे रोजी सिंदी रेल्वे येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी स्नेहल कलोडे, तहसिलदार शंकुतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, उपनिबंधक अमर अरमरकर, उपअधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी दिलीप गर्जे, गट शिक्षणाधिकारी संगिता महाकाळकर आदी उपस्थित होते.

सिंदी रेल्वे येथील स्नेहदिप मंगल कार्यालय येथे आयेाजित समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. समीर कुणावार यांनी उपस्थित शेतकरी, महिला, शेतमजूर व इतर नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घेऊन शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शिबिरामध्ये लावण्यात आलेल्या विविध विभागातील योजनांच्या स्टॉल वरुन योजनांची माहिती घ्यावी व आपले प्रलंबित प्रकरणे पुर्ण करुन घ्यावे तसेच संबंधीत विभागांनी नागरिकांच्या तक्रार अर्जाचा निपटारा तात्काळ करावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

प्रास्ताविकातून शकुंतला पाराजे यांनी शिबिराचे वेळापत्रक व सदर शिबिरामध्ये देण्यात येणा-या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. सर्वप्रथम आ. समीर कुणावार यांनी शिबिरस्थळी लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या 15 स्टॉलची पाहणी करुन कामकाजाची माहिती जाणून घेतली. शिबिरामध्ये एकुण 12 हजार 695 लाभार्थ्यांना विविध योजना व सेवांचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागामार्फत लावण्यात आलेल्या स्टॉलवर 147 लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणी केली.

कार्यक्रमाचे संचालन रमेश भोले यांनी तर आभार विजय कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला नायब तहसिलदार मधुकर ठाकरे, कलिंगकुमार किरसान, माधव राठोड, सर्व मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग, कृषि विभाग, महिला व बाल विकास विभाग, एसटी महामंडळ व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.