(नंदुरबार) : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी, 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
विविध लोकाभिमुख उपक्रमातून नागरिकांमध्ये शासानाप्रती विश्वास वृद्धींगत करणार -जिल्हाधिकारी मनीषा खत्री
या संदर्भात श्रीमती खत्री यांनी एका परिपत्रकान्वये नियोजनाचे निर्देश विविध यंत्रणांना दिले आहेत. यात महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करुन महसुल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, महसुल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी तो आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व प्रशासन व जनता यांच्यात सुसंवाद वाढविणारा ठरावा यासाठी, 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या सप्ताहात प्रत्येक दिवशी विविध लोकाभिमुख उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जाणार असल्याचे श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
असे असतील उपक्रम
शुभारंभ: मंगळवार, 1 ऑगस्ट, 2023 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी विभाग निहाय संवर्गानिहाय उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानाबरोबर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली पारीत होणारे दुरुस्ती आदेशाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण,तसेच गाव तेथे स्मशानभुमी, दफनभुमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
युवा संवाद: बुधवार, 2 ऑगस्ट, 2023 रोजी “युवा संवाद” उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करणे, आधारकार्ड दुरुस्ती केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे, अद्ययावत करणे तसेच शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.
एक हात मदतीचा: गुरुवार, 3 ऑगस्ट, 2023 रोजी ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदीनुसार बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोईसुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्याकरीता अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व 8-अ सारखे उतारे, तलाठीस्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात येणार आहेत. तसेच अतिवृष्टी, पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात येईल व तालुक्याच्या अतिदुर्गम गावात महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येईल.
जनसंवाद: शुक्रवार, 4 ऑगस्ट, 2023 रोजी “जनसंवाद” कार्यक्रमात महसुल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित असलेली प्रकरणे, अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच सलोखा योजनेंत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता शिबीरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जमिनविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतील. तसेच “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचीही दखल घेऊन या तक्रारी निकाली काढण्यात येणार आहेत.
सैनिकहो तुमच्यासाठी… शनिवार 5 ऑगस्ट, 2023 रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सीमावर्ती भागामध्ये तसेच अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यात करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.
एक संवाद सेवानिवृत्तांशी: रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी ‘महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येणार आहेत.
सप्ताहाची सांगता: सोमवार, 7 ऑगस्ट, 2023 रोजी “महसूल सप्ताह सांगता समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल यंत्रणेमार्फत या कालावधीत राबविलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ करण्यात येणार आहे.
या महसुल सप्ताहात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत सहभाग नोंदवून महसूल सप्ताह नियोजनपूर्वक यशस्वी करण्याचे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.
















