(नंदुरबार) आदिवासी विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या ‘प्रकाशवाटा’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या केंद्रांची आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तसेच परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पंकज पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार येथे ई-लायब्ररी, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ॲस्ट्रोनॉमिकल लॅब, टॅब लॅब, वर्गखोल्या व मुलांच्या वसतिगृहाची पाहणी करून आवश्यक सुधारणा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. ![]()
त्यानंतर शासकीय आश्रमशाळा, कोठली येथे विद्यार्थिनींसाठी तयार करण्यात आलेल्या निवासी व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थिनींनी लेझीमच्या माध्यमातून स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण, निवास व सुविधांबाबत माहिती घेतली.
‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत नंदुरबार, कोठली आणि ढोंगसागळी येथील केंद्रांमध्ये २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना निवासी स्वरूपात प्रवेश देऊन नामांकित संस्थेमार्फत एक वर्षाचे NEET-JEE प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रे लवकरात लवकर पूर्णपणे सुसज्ज करून पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण करण्याचे निर्देश देत, आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला.
#Prakashwata#Nandurbar#DrMittaliSethi#NEET#JEE#TribalEducation#QualityEducation#StudentSuccess#GovernmentSchool#TeamNandurbar#EducationForAll
















