
नंदुरबार तालुक्यातील पिंपलोद या छोट्या गावात राहणाऱ्या फुलवंती आमाश्या प्रधान या आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. आत्मविश्वास, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी केवळ स्वतःचं जीवन बदललं नाही, तर इतर महिलांसाठीही आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविला आहे.
कधी काळी घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. पतीसह त्यांनी मजुरीसाठी सुरतचा प्रवास केला होता. परंतु, मनाच्या कोपऱ्यात एक ठाम विचार होता — ‘काहीतरी स्वतःचं करायचं!’
तेव्हाच फुलवंतीताई महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत असलेल्या ‘जय कुबेर’ स्वयं सहाय्य गटात सामील झाल्या. माविममार्फत मिळालेल्या विविध प्रशिक्षणांचा आणि योजनांचा फायदा घेत त्यांनी पाव, खारी आणि टोस्ट उत्पादन व्यवसाय आधुनिक पद्धतीने सुरू केला. सुरुवातीला वडिलोपार्जित छोट्या स्वरूपातील व्यवसाय चालविताना अनेक अडचणी आल्या. परंतु माविमच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी मिक्सर मशीन आणि ओव्हन खरेदी केली. यामुळे त्यांच्या व्यवसायाची गती वाढली, मेहनत कमी झाली आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.
आज फुलवंतीताई दररोज 120 ते 150 किलो पाव तयार करतात, ज्यातून त्यांना ₹8,000 ते ₹9,000 इतके दैनिक उत्पन्न मिळते. एवढेच नव्हे तर त्यांनी 3 ते 4 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण कुटुंब या व्यवसायाशी जोडले गेले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे.
फुलवंतीताईंचे एक वाक्य त्यांच्या प्रवासाचे सार सांगते —
“महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, तर काहीही अशक्य नाही. मेहनत केली की यश नक्की मिळतं.”
आज त्या आपल्या गावातील आणि परिसरातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांच्या हातचा पाव जसा सुगंधी आहे, तसाच त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवासही सुगंधी, गोड आणि प्रेरणादायी आहे.
#Nandurbar#MAVIM#TejaswiniAbhiyan#WomenEmpowerment#SelfHelpGroup#NaviShakti#SuccessStory#AtmanirbharMahila#CollectorOfficeNandurbar#FulanvatiTai#InspiringJourney















