
जळगाव/धुळे/नंदुरबार : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 49 हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्याकडे घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीतून माध्यमातून 180.76 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीजहकांना वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस जळगाव परिमंडलात वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.
याबरोबरच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.
जळगाव परिमंडलातील 49 हजार 338 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. यात जळगाव मंडलातील 30 हजार 520 ग्राहकांनी 113.12 मेगावॅट, धुळे मंडलातील 13 हजार 101 ग्राहकांनी 47.4 मेगावॅट तर नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 717 ग्राहकांनी 20.24 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे.















