Home शेती देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज –...

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

1
Promoting agricultural research and experience-based education is the need of the hour for the country's food security – Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narwekar.

रायगड: देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज असून राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी.वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे,मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमाने देशाला अन्नसुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड

दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले, तर शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणे,ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले.कार्यक्रमास  प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.