Home नंदुरबार जिल्हा श्रॉफ हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रमाचे सतरावे वर्ष 900 विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी...

श्रॉफ हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रमाचे सतरावे वर्ष 900 विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सूर्यनमस्कार करत नववर्षाचे स्वागत

1
Seventeenth year of innovative initiative at Shroff High School, District Collector Dr. Mittali Sethi along with 900 students welcomed the New Year by performing Surya Namaskar

(नंदुरबार) निरोगी शरीर, स्थिर मन आणि सकारात्मक विचारांची भक्कम पायाभरणी विद्यार्थीदशेतच होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून योग व आरोग्याचा संदेश देणारा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. यंदा या उपक्रमाचे सतरावे वर्ष असून इयत्ता सातवी व आठवीच्या तब्बल 900 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार सादर करून नववर्षाचे स्वागत केले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी, डॉ.वैभव सबनीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्काराची आलंबने सादर करून या उपक्रमाला कृतीयुक्त पाठिंबा दिला. सूर्यनमस्कार हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून शरीर व मनाचा सर्वांगीण विकास साधणारे प्रभावी योगसाधन आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हा प्रशासन बालकांच्या आरोग्य व पोषणावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून योग, सूर्यनमस्कार यांसारखे आरोग्यवर्धक उपक्रम गावागावापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. नव्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, मात्र त्याचबरोबर डिजिटल डिटॉक्सही तितकाच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “कीप शायनिंग”चा संदेश देत विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक विचारांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, मुख्याध्यापक सौ. सुषमा शाह, तालुका क्रीडा प्रमुख श्री महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक सौ. सुषमा शाह यांनी गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. स्पर्धात्मक युगात मन:शांतीसाठी योग आणि सूर्यनमस्कार अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिस्तबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आरोग्याचा सकारात्मक संदेश यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

#SuryaNamaskar#NewYear2026#ShroffHighSchool#YogaForHealth#HealthyStudents#PositiveMind#IndianCulture#Nandurbar#DrMittaliSethi#StudentWellbeing