रात्रीच्या काळोखानंतर नवी पहाट उगवतेच, पण ती पहाट केवळ प्रकाशाची नव्हे, तर अनेक आशा-आकांक्षांनी भरलेली असते, नव्या स्वप्नांची असते. नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांना अशीच एक प्रेरणादायी पहाट अनुभवायला मिळाली, जेव्हा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांच्यासोबत रामप्रहरी संवाद साधला. ही भेट केवळ औपचारिक नव्हती; ती होती एका संवेदनशील मनाच्या प्रशासकाची, शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्यांना जवळून समजून घेण्याची होती…
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा लिलावाच्या बोलीचे स्वर एकमेकांवर कुरघोडी करत होते. बाजारभाव, पिकांना कीड, पाणीटंचाई, कर्ज, शासनाची मदत, सबसिडी या सगळ्यांवर गोष्टी सुरू होत्या. अशा वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी या साध्या पण ठाम विश्वासाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधायला उभ्या राहिल्याचे पहायला मिळाले. त्या व्यापारी/शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणींमध्ये हरवून गेल्या होत्या, जणू त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या मनाततील संकल्पनेला आकार देत होता.
एक वृद्ध शेतकरी, ज्याच्या चेहऱ्यावर कष्टाची व्यथा स्पष्ट दिसत होती, त्याने सांगितलं, “आम्ही तासनतास इथे असतो, लिलाव समाधानकारक होईपर्यंत थांबतो. कधीकधीतर खूपच उशीर होतो, आम्हाला येथे निवासस्थानांची सुविधा मिळाली तर खूपच सोयीचं होईल, मॅडम !” यावर जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या, “तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही. प्रशासन तुमच्यासाठी आहे, तुमच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू.”
डॉ. सेठी यांच्या प्रतिसादाने त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान झळकत होतं.
हवामान बदल, सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि उत्तम बाजारपेठांशी जोडणीवर चर्चा झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांशी या विषयांची माहिती घेतली. त्यांच्या प्रत्येक कृतीत फक्त ज्ञान,जिज्ञासा नव्हती, तर एक धीर देण्याचा प्रयत्न होता.
व्यापारी/शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचं ओझं हलकं केलं, पण या संवादाच्या शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. “आज पहिल्यांदाच असं वाटतंय की आमचं दुःख जाणून घेण्याची कुणाला तरी खरंच इच्छा आहे.” या कृतार्थ भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
या भेटीतून शेतकऱ्यांना नव्या पहाटेची उमेद मिळाली आहे. कष्टानं भरलेल्या त्यांच्या वाटेवर आता प्रशासन एका पाथ फाईंडर सारखं असेल, ही खात्री त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.
संवेदनशील जिल्हाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संवेदनशील कृतीतून नंदुरबारसारख्या दुर्गम भागात जो आशेचा दीप तेवत आहे, तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
जेव्हा एक कुशल प्रशासक खऱ्या अर्थाने जनतेशी जोडला जातो, तेव्हा त्यांच्या समस्या सुटण्याबरोबरच जनतेच्या स्वप्नांना नवे बळ मिळते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिवसांचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले आहे. त्या उद्दिष्टांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि त्यांच्या टीम चे यांचं कार्य म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्याला समृद्धीच्या दिशेने नेऊ पाहणारी एक नवी पहाटच आहे. अशी पहाट, जिथं आशा, आकांक्षा, समाधान, आणि गती-प्रगतीचा सूर जनता आणि प्रशासनात जुळेल्याशिवाय राहणार नाही.
००००००००००

#शेती#प्रेरणा
#शेतकरीहित
#प्रशासनाचीजबाबदारी
#सेंद्रियशेती
#नंदुरबार
#उत्तमबाजारपेठ
#आशेचीपहाट