जगातील सर्वोत्तम आदर्श मातृत्व, महाराष्ट्राच्या मातीला स्वातंत्र्य, स्वाभिमानाची आणि सन्मानाची शिकवण देणाऱ्या राजमाता, ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याच देखणं स्वप्न साकार झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती 12 जानेवारी 2026 रोजी साजरा होत आहे. त्या महामातेविषयी पुढील गौरवोद्गार सार्थ ठरतात.
काय वर्णावा महिमा तुझ्या मायेचा
आसरा मज तुझ्या शीतल छायेचा
पुण्यकर्म सारे वसती तुझ्या ठाई
नांदे शिवशाहीचा संसार तुझ्या पाई
जिजाऊंचा जन्म : सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी एक कन्यारत्न जन्माला आले. त्या कन्येचे नाव जिजाबाई असे ठेवले होते. लखुजी जाधव हे निजामशाहीमध्ये जहागीरदार होते. तर त्यांचे चार पुत्र म्हणजेच जिजाबाईंचे भाऊ दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादुरजी हेदेखील निजामशाहीमध्ये सरदार होते. अशा शौर्यवान घराण्यात जिजाबाई यांचे संगोपन झाले. त्यामुळे मुलगी असूनही त्यांना शस्त्र आणि शास्त्राचे देखील शिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे जिजाऊत बालवयापासूनच राजकीय महत्त्वाकांक्षा होती. जिजाऊत करारीपणा, आत्मविश्वास, करुणा, मुत्सद्दीपणा, तीव्र आत्मसंयम, कणखरपणा, तल्लख बुद्धिमत्त्ता, निस्वार्थ वृत्ती, स्वाभिमान, मानवतावाद, विज्ञानवाद, परिवर्तनवादी विचार इ. सद्गुणांचा संगम होता.
जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणजेच त्यांचे माहेर ‘सिंदखेडराजा’ हे विदर्भातील. सासर वेरूळ हे मराठवाड्यातील. स्वराज्याचा विस्तार आणि वास्तव्य केले सह्याद्रीच्या कुशीत पुणे जिल्ह्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर त्यांनी कृतार्थ मनाने रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला 17 जून 1674 रोजी शेवटचा श्वास घेतला तो म्हणजेच कोकणात. आम्ही मात्र आजही आमच्या मुलीच्या लग्नाचा विचार करताना गावाजवळ, तालुक्यात, जिल्ह्यात कसा होईल याचा विचार करतो पण 16 व्या शतकात जिजाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करणे केवळ अलौकिक आणि अभिमानास्पद असेच आहे. त्यांचे कार्य, शिकवण व जीवन चरित्र हा महाराष्ट्राचा साक्षात राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ठेवाच आहे. जगातील सर्वश्रेष्ठ राजनितीज्ञ, सर्वश्रेष्ठ योद्धा, सर्वश्रेष्ठ भाषातज्ञ, कुशल व्यवस्थापक, सर्वकलानिपुण व्यक्ती म्हणजे जिजामाता. शहाजीराजांच्या दरबारातील कवीश्रेष्ठ जयरामपिंडे हे जिजाऊंबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात,
जशी चंपकेशी खुले फुल जाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।।
जिचे कीर्तीचा चंबु जंबु द्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला ।।
अर्थ : एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईंच्या फुलाच्या ताटव्याने खुलून जातो त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते. असे असले तरी केवळ शहाजीराजांची पत्नी एवढीच जिजाऊंची ओळख नव्हती. जिजाऊंच्या वैयक्तिक कार्याचा, कर्तृत्त्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा गौरव सर्वदूर व सर्व दिशांमध्ये आदराने होत असे. अशा जिजाऊंनी सावली होऊन आपल्या सुपुत्राला सर्वच प्रकाराची सोबत, शिक्षण दिले. आई होऊन वीर सुपुत्र शिवाजीराजे यांच्यावर आयुष्यभर सावली धरली.
जिजाऊ-शहाजीराजे विवाह :- 1610 मध्ये शहाजीराजे व जिजाऊ यांचा विवाह दौलताबाद (देवगिरी) येथे झाला. जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव हे सिंदखेडराजाचे होते. लखुजीराजे जाधव हे देवगिरीच्या यादवाचे वंशज होते. लखुजीराजे जाधवांना चार मुलानंतर जिजाऊ झाल्या होत्या. जाधव घराणे व भोसले घराणे यांच्यामध्ये जिजाऊ व शहाजीराजे यांच्या विवाहामुळे दोन्ही घराण्याचा लौकिक आणखी वाढला. फलटणच्या निंबाळकर घराण्यात दोन्ही घराण्यांचे पूर्वीपासूनच नाते होते. वणगोजी निंबाळकर यांची बहीण गिरीजाबाई लखुजीराजे यांच्या पत्नी होत्या. तसेच वणगोजी निंबाळकर यांची मुलगी उमाआक्का मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या. उत्साही वातावरणात व थाटामाटात असा जिजाऊ व शहाजीराजांचा विवाह सोहळा संपन्न झाला. भोसले घराणे हे जाधव घराण्यासारखेच तोलामोलाचे होते. तसेच लखुजीराजे जाधव यांचे मालोजीराजे यांच्याशी नात्यासोबत मैत्रीचे नाते निंबाळकर घराण्यामुळे झाले होते.
कविंद्र परमानंद आपल्या शिवभारतात या विवाहाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात. उत्तम लक्षणांनी युक्त, दानशील, दयाशील, युद्धकुशल, महातेजस्वी अशा मालोजीपुत्र शहाजीस पाहून कुबेराप्रमाणे संपत्तीमान जाधवरावाने, अनुकूल गुण असलेल्या अशा ज्योतिषाने सांगितलेल्या मुहुर्तावर आपली विजयलक्षणा, कमलनेत्रा आणि कुलास शोभा आणणारी, कुळवान मुलगी जिजा वरदक्षिणेसह शहाजीस अर्पण केली.
जिजाऊ व शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला. त्यासाठी येईल त्या संकटांना सामोरे जाण्याचे ठरवले. शहाजीराजांच्या शौर्याची सर्वांनी नोंद घेतली. शहाजीराजे व लखुजीराजे हे जावई-सासरे एक झाल्यास ते स्वतंत्र राज्य स्थापन करतील, या भीतीने देवगिरीच्या किल्ल्यात लखुजीराजे यांची 25 जुलै 1629 रोजी निजामशहाने हत्या घडवून आणली. यामुळे जाधव घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. यातून सावरत शहाजी व जिजाऊ यांनी परकीय यवनांची जुलमी राजवट नष्ट करून रयतेचे राज्य स्थापनेची, राजकारणाची पुढील दिशा ठरविली. यातूनच हिंदवी स्वराज्याचे बीज पेरले गेले.
स्वराज्याचा संकल्प उराशी बाळगून शहाजीराजेही काम करत होते. पण निर्णायक असे काही घडत नव्हते. दरम्यान या पार्श्वभूमीवर जिजाऊंच्या पोटी 1621 मध्ये संभाजी नावाचा पहिला पुत्र जन्मला. त्यानंतर चार अपत्यांचा जन्म झाला पण ते जगले नाही. मग त्यांचे सहावे अपत्य 19 फेब्रुवारी 1630 रोजी (फाल्गुन वद्य तृतीया शके 1551) सायंकाळी सहा वाजता किल्ले शिवनेरीवर कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. जिजाऊ व शहाजीराजांनी संभाजी व शिवाजी या दोन्ही भावंडांना शास्त्र, शस्त्र, राजनीती, भाषा, विज्ञान, भूगोल अशा सर्वच विषयात अगदी निपुण केले होते.
जिजाऊंचा संघर्ष:- जिजाऊंच्या संपूर्ण जीवनकार्याची फलनिष्पत्ती म्हणजेच स्वराज्याची निर्मिती. जिजाऊंनी आयुष्यात व्यक्त केलेला निर्धार पूर्ण केला. स्वराज्यासाठी संसारसुखाचा, कुटुंबाचा व सर्वस्वाचा त्याग केला. ऐन विशीत भाऊ व चुलत दिरांसह अनेक नातेवाईक मराठ्यांच्या हत्या. स्वतःची चार अपत्ये धावपळीत मृत्यू पावली. स्वतःचे वडील, भाऊ व भाचे असे चार महाबलवान आप्तेष्ट निजामशहाकडून कपटाने मारले गेले. दूर कर्नाटकात मोठा मुलगा संभाजी व पती शहाजीराजे यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराज अनेकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. अफझलखानाची स्वारी, पुरंदरचा वेढा, लालमहालातील शाहिस्तेखानावरील हल्ला, आग्रा येथील औरंगजेबाची भेट, अपमान, कैद व नंतर सुटका, शिवराज्याभिषेक विधीसाठी ब्राह्मण-पुरोहितांचा जाहीर विरोध, असे अनेक जीवावरचे प्रसंग तसेच दु:ख, वेदना, कटू प्रसंगी जिजाऊंनी आपल्या मायेची ऊब आणि ध्येयवृत्ती शिवबावर आणि स्वराज्यातील रयतेवर कायम जागती ठेवली. जगाच्या इतिहासात एका महिलेने केलेली स्वराज्य स्थापनेसाठी केलेली प्रचंड धडपड यशस्वी ठरली. जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्नं पाहिलं म्हणून ते शिवरायांनी पूर्णच केले नाही तर त्यांनी त्या स्वप्नाला अविरत परिश्रम, त्याग, शिस्त, संस्कार, शिक्षण, संघर्ष, मानवता, समानतेच्या माध्यमातून असंख्य अडथळे पार करत प्रत्यक्ष साकार केले. लाखोंचा पोशिंदा रयतेचा राजा घडवला .त्यामुळेच त्यांना स्वराज्यप्रेरिका, आदर्श माता म्हणून जगभर ओळखले जाते. आजही जिजाऊ जगासाठी जाज्वल्य प्रेरणास्रोत आहेत.
जिजाऊंची शिकवण:- आज प्रत्येक घरात जिजाऊंच्या विचारांचे आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज निर्माण व्हायला हवेत. कारण अभ्यासू, प्रामाणिक, व्यसनमुक्त आणि चांगल्या संस्कारांचे तरुणच समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यावर मात करू शकतात. तसेच आमच्या आयाबहिणींना निर्भयपणे जगता यावे यासाठी त्यांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा आदर्श प्रस्थापित करावा. त्यासाठी घराघरातील माता-भगिनींनी जिजाऊंचे जीवनचरित्र आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र त्याकरिता घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषांनी आधुनिक ‘शहाजी’ म्हणून त्यांना तशी संधी, सहकार्य, सन्मान, स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. कारण जिजाऊंचा विचारच या देशाला योग्य दिशा देणारा आहे. अठरा पगड जाती-जमातींच्या, विभागलेल्या, विषमतेने गांजलेल्या, अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी आजच्या तरुण-तरुणींनी जिजाऊंच्या संस्काराची शिकवण, त्यांचा प्रेरणादायी विचार अंगीकारावा. तो आत्मसात करून त्या विचारानुसार आपली वाटचाल करावी. त्यांचा विचार जिवंत ठेवून पुढील पिढ्यांमध्ये रुजवणे हेच खऱ्या अर्थाने स्वराज्यप्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना खरे अभिवादन ठरेल.
















