Home नंदुरबार जिल्हा CROPSAP अंतर्गत हरभरा पिकासाठी शेतीशाळेचा तिसरा वर्ग संपन्न

CROPSAP अंतर्गत हरभरा पिकासाठी शेतीशाळेचा तिसरा वर्ग संपन्न

2
Third class of agricultural school for gram crop completed under CROPSAP

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (CROPSAP) अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील रब्बी हंगामातील प्रमुख हरभरा पिकासाठी मौजे वडवद येथे शेतीशाळेच्या तिसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेचा उद्देश शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन उत्पादन वाढ व खर्चात बचत साधणे हा आहे.

या शेतीशाळेसाठी 25 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, प्रत्यक्ष निरीक्षणांसाठी होस्ट फार्मरचा शेत प्लॉट निश्चित करण्यात आला आहे. हरभरा पिकाच्या संपूर्ण कालावधीत एकूण पाच शेतीशाळा वर्गांचे नियोजन करण्यात आले आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांना चार गटांत विभागून प्रत्येक गटाला ‘मित्र कीड’ यांच्या नावाने ओळख देण्यात आली आहे.

शेतीशाळेच्या वर्गात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. चारही गटांतील शेतकरी होस्ट फार्मरच्या प्लॉटला भेट देऊन पिकावरील रोग-कीड, मित्र कीड, हवामान, जमिनीची स्थिती आदींची सखोल निरीक्षणे नोंदवतात. ही निरीक्षणे शेतकरी स्वतः ड्रॉइंग शीटवर सादर करतात व गटातील प्रतिनिधीमार्फत वर्गासमोर मांडली जातात.

त्यानंतर पुढील कालावधीत हरभरा पिकावर करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करून त्या उपाययोजना गावपातळीवर लागू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. शेतीशाळेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी सामूहिक खेळांचे आयोजनही करण्यात येते.

या तिसऱ्या वर्गात मंडळ कृषी अधिकारी श्री. कुणाल ठाकूर (कोरिट) व उप कृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे यांनी मार्गदर्शन केले. शेतीशाळेचे आयोजन व समन्वय सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दीपक राजपूत यांनी केले.

या प्रकारच्या शेतीशाळांमुळे शेतकऱ्यांना रोग-कीड व मित्र कीड यांची ओळख, एकात्मिक खत व कीड व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत असून, उत्पादन वाढीसह उत्पादन खर्च कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

(Collector Office Nandurbar)

#CROPSAP#pestmanagementsolutions#SustainableAgriculture