वर्धा: पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान करुन गर्भपात करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर खबरी योजनेंतर्गत 1 लाख रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. गर्भलिंग निदान करुन गर्भपात होत असल्याची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 व सुधारीत अधिनियम 2021 नुसार जिल्ह्यामध्ये 12 आठवड्यापर्यंत, 12 ते 20 आठवड्यापर्यंत, 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी शासकीय तसेच खाजगी आरोग्य संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच 24 आठवड्यापलीकडील गर्भपातास मान्यता देण्याकरीता सामान्य रुग्णालय येथे स्वतंत्र मेडीकल मंडळाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे.
सामान्य रुग्णालय येथे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनसामान्यांना कायद्याची माहिती होण्याकरीता तसेच गर्भलिंग निदान करुन गर्भपात करण्याकरीता प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कार्यवाही करण्याकरीता www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा 18002334475/104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी कळविले आहे.
















