(नंदुरबार)‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई येथे समागम कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन धर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज (विधान परिषद सदस्य) यांनी आज केले
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज नियोजन भवन सभागृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, बंडू महाराज, सुधाकर भाऊ, आनंद महाराज, वसंत महाराज, विविध विभागाचे विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय जागरण, प्रचार व प्रसार समितीचे सर्व सदस्य आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
धर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज यावेळी बोलतांना म्हणाले, खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमास सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासिन व भगत नामदेव परंपरा समाज या समाजाचे साधुसंत, मान्यवर व मागदर्शक उपस्थित राहणार आहेत, हा कार्यक्रम यापूर्वी नागपूर, नांदेड येथे यशस्वीरित्या पार पडला असून खारघर येथील कार्यक्रमही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार समन्वय करुन भाविकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्याची व्यवस्था करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी सांगितले की, कार्यक्रमाबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच कार्यक्रमास जाण्यासाठी 6 वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वाहनात मेडीकल किट, पाण्याची व्यवस्था आदि सर्व सुविधा करण्यात येणार आहे, कार्यक्रमास जिल्ह्यातून जास्तीत जास्त भाविक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविकात बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी सांगितले जिल्ह्यातील 90 टक्के शांळामध्ये तसेच प्रत्येक सिनेमागृहात श्री गुरु तेग बहादूर साहिब जी गीत वाजविण्यात आले असून जिल्ह्यात या कार्यक्रमाची जनजागृती चांगल्या प्रकारे होत आहे असे सांगितले.
















