
(नंदुरबार) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली असून, सन 2025 पासूनचे सर्व अर्ज आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
पारंपारिक पद्धतीला फाटा
यापूर्वी कृषी पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागत होते. या प्रक्रियेत कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, छपाई आणि पोस्टाचा खर्च यामुळे अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. तसेच, पडताळणी आणि संकलनासाठी बराच वेळ लागत असे. हीच अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.
पुरस्कारांची व्याप्ती
या प्रणालीद्वारे राज्यातील शेतकरी, महिला, संस्था आणि कृषी विभागातील कर्मचारी खालील पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात:
• डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न
• वसंतराव नाईक कृषिभूषण व शेतीमित्र
• वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी
• जिजामाता कृषिभूषण
• उद्यानपंडित आणि युवा शेतकरी पुरस्कार
• सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार
• पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न (कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी)
शेतकऱ्यांना होणारे फायदे
• घरबसल्या अर्ज: शेतकऱ्यांना आता कार्यालयात न जाता घरबसल्या अर्ज सादर करता येईल.
• खर्चात बचत: छपाई, झेरॉक्स, प्रवास आणि पोस्टाचा खर्च वाचणार आहे.
• स्थितीची माहिती: आपला अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती ऑनलाईन पाहता येईल.
• कागदपत्रांची सुलभता: एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज भासणार नाही.
असा करा अर्ज
इच्छुक शेतकरी, संस्था किंवा गटांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) जाऊन ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.















