कृषी विभाग नंदुरबार, पाणी फाउंडेशन, उमेद अभियान आणि आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याच्या दुसऱ्या बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. दि. 12 ते 14 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
या प्रशिक्षणाचे आयोजन पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी या प्रशिक्षणात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकूण 48 जणांची उपस्थिती नोंदवण्यात आली, ज्यामध्ये 21 महिला, 24 पुरुष तसेच कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनचे प्रत्येकी एक प्रतिनिधी सहभागी होते.
प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी श्री. राजपूत यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना फार्मर कप स्पर्धा व प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी श्री. गिरासे व श्री. लाड, तसेच उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे श्री. हर्षद वाघ व श्री. पंकज खोडके उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या निवासी प्रशिक्षणात शेतकऱ्यांना शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि समूह शेती या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांमध्ये नवीन ज्ञान, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाल्याचे दिसून आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती मिळून त्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळण्यास मदत होणार आहे. या यशस्वी प्रशिक्षणासाठी कृषी विभाग, उमेद अभियान, पाणी फाउंडेशन तसेच सर्व संबंधित घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
#farmercup2026#agriculture#collectorofficenandurbar#SustainableFarming#PaaniFoundation
















