Home महाराष्ट्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जूनपासून नवीन अभ्यासक्रम होणार सुरु –  मंत्री मंगलप्रभात...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जूनपासून नवीन अभ्यासक्रम होणार सुरु –  मंत्री मंगलप्रभात लोढा

0
New courses will be started in government industrial training institutes from June – Minister Mangalprabhat Lodha

नागपूर:- नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब टाळण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस सारख्या शासनाच्या तत्पर धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. यातून औद्योगिक, सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सौर विद्युत तंत्रज्ञान क्षेत्रात अफाट रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. काळाशी सुसंगत नवनवीन आवश्यक असणारे कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी येत्या जूनपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करू असे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले.

कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व या संस्थेला शहीद हेमंत करकरे असे नामकरण राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर माजी आ. देवराव रडके, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालयचे संचालक सतीश सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.

सौर ऊर्जा तंत्रज्ञान, याची उपकरणे व त्याची निगा, डिजिटल इंडियाला साकारणारे तंत्रज्ञान व सेवाक्षेत्र याला अधोरेखित करून ग्रामीण भागातील युवकांना या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीवर स्वार होता यावे यासाठी नवीन कोर्स, ट्रेड शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु व्हावेत व यातील काही कोर्स कामठी येथे सुरु व्हावेत अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात केली होती. मंत्री श्री लोढा यांनी ही मागणी नम्रतेने स्वीकारत कामठी आयटीआय येथे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासह येथील प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन राज्यातील एक आदर्श शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून याला नावारूपास आणू असे सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होईल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

येत्या पाच वर्षात कोराडी येथील शैक्षणिक व प्रशिक्षण संकुल भक्तीसह सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे केंद्र म्हणून साकारेल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या राजकीय जबाबदारींना समर्थपणे पेलत कोराडी येथील संस्थानाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे कार्य केले आहे. या भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशा मिळाव्यात यासह त्यांना गारमेंट, होजिअरी व इतर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून धैर्य दिले आहे. याठिकाणी अत्यंत आदर्श असे कौशल्य विद्यापीठ साकारण्याची सर्व क्षमता आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून नियोजन केले अशा  शब्दात मंत्री श्री लोढा यांनी गौरव केला. कोराडी हे भक्तीसह सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे केंद्र म्हणून समोर असा विश्वास त्यांनी व्यक्त करून यासाठी शासन व इतर उपक्रमातून आम्ही निश्चित हातभार लावू असे सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही होईल लाभ –  महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बदलत्या काळाप्रमाणे रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासासाठी गत दहा वर्षात सातत्याने प्रयत्नरत राहून ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षणासाठी शासकीय शैक्षणिक यंत्रणांना नवे रूप दिले आहे. औद्योगिक, सेवा व  डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा क्षेत्रातील रोजगाराच्या अफाट संधीचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होण्यासाठी आणखी नव्या अभ्यासक्रमांची जोड आवश्यक आहे. या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले युवक जागतिक पातळीवर आपले कसब व कौशल्य सिद्ध करून दाखवतील असा विश्वास  महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.