(नंदुरबार) वातावरणातील बदलामुळे उन्हाळी हंगामात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाढत्या उष्णतेचा आणि संभाव्य उष्णतेच्या लाटेचा मानवी शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष ‘आरोग्य सल्ला’ जारी केला असून, नागरिकांनी स्वतःचा उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आरोग्य विभागाकडून विशेष मार्गदर्शक सूचना
नागरिकांनी ‘हे’ करावे:
• हायड्रेटेड रहा: तहान लागलेली नसली तरीही सतत पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा . ओआरएस (ORS), लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा रस घ्या. टरबूज, खरबूज, संत्री, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.
• योग्य कपडे वापरा: पातळ, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे परिधान करा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा टॉवेलने डोके झाका आणि चप्पल किंवा शूज न घालता बाहेर पडू नका.
• घरे थंड ठेवा: दिवसा उन्हाच्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे बंद ठेवा, तर रात्री थंड हवेसाठी खिडक्या उघडा. शरीर थंड ठेवण्यासाठी पंखे, ओले कापड किंवा बर्फाचा वापर करा.
‘हे’ करणे टाळा:
• दुपारी 12-00 ते 3-00 या वेळेत उन्हात बाहेर पडणे आणि अति परिश्रमाची कामे करणे टाळा .
• चहा, कॉफी, अल्कोहोल आणि जास्त साखरेची शीतपेये टाळा, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
• जास्त प्रथिनांचे आणि शिळे अन्न खाणे टाळा.
• पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका.
उष्माघाताची लक्षणे आणि उपाय:
चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, गडद पिवळी लघवी होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे ही उष्णतेची लक्षणे आहेत . शरीराचे तापमान 40°C (104°F) किंवा त्याहून अधिक होणे, त्वचा कोरडी पडणे आणि बेशुद्ध होणे ही उष्माघाताची (Heat Stroke) गंभीर लक्षणे आहेत.
अशी लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरित थंड ठिकाणी हलवून ओल्या कपड्याने शरीर पुसावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी त्वरित 108 किंवा 102 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः झोपडपट्टीत राहणारे नागरिक, रस्त्यावरील किंवा फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रा, धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समित्या आणि आठवडा बाजारातील विक्रेते व ग्राहक यांच्यावर उष्णतेचा परिणाम जास्त होण्याची शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध, लहान मुले आणि महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य सल्ल्यातील नियमांचे पालन करावे, जेणेकरून उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींपासून स्वतःचा बचाव करता येईल, असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशा संघवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
















