
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूककोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
घनकचराव्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रांसाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह चाकण, तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, ऊर्जा, पोलीस, नगररचना, कामगार, पीएमआरडीए आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.















