Home महाराष्ट्र पाणी पुरवठा वेळेत होण्यासाठी कामांची गती वाढवा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

पाणी पुरवठा वेळेत होण्यासाठी कामांची गती वाढवा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

0
Speed ​​up the work to ensure timely water supply – Divisional Commissioner G. Srikanth

छत्रपती संभाजीनगर :(विमाका) शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच शहराला वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अपर आयुक्त (विकास व नियोजन) सुषमा देसाई, सहआयुक्त देविदास टेकाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सबंधित कंपनीला दिले आहेत. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्याबाबत विविध सूचना संबंधितांना दिल्या.

नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी प्रक्रिया केंद्र, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी यावेळी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे संबंधित कंत्राटदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांनी समन्वयाने व तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

तसेच, या कामांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दररोज देखरेख ठेवून प्रगती अहवाल सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.