
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, खापर, कोराईसह वाण्याविहीर आदी गावांमध्ये जीवघेणी रसायन मिश्रित ताडीची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने या जीवघेण्या रसायन मिश्रित ताडी पिणारे नाहक अनेक बळी गेले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, खापर, कोराई, वाण्याविहीर आदी गावांमध्ये सर्रासपणे जीवघेणे रसायन मिश्रित ताडीची विक्री केली जात आहे. ही रसायन मिश्रित ताडी पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. दररोज शेकडो लिटर्स बनावट ताडी विक्री केली जात असून अनेक गावांमध्ये पुरवठा करण्याच्या गोरख धंदा सुरू आहे. या बनावट ताडीच्या आहारी गेलेल्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावून अनेकांचे बळी गेल्याचे प्रकार समोर येत आहेत. या अवैध धंद्याकडे स्थानिक पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कुठलीही कठोर कारवाई केली जात नसल्याचे आहारी केलेल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या बळी गेल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. या संतापजनक गंभीर प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दखल घेऊन मोहीम हाती घेऊन बनावट ताडी तसेच हातभट्टी हद्दपार करण्यासाठी मोहीम हाती घेण्याची तीव्र मागणी केली जात आहे. अक्कलकुवा तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेला तालुका आहे. या तालुक्यातील अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बनावट ताडी परप्रांतीयांच्या सहकार्याने केली जात असून, ही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे. ताडीची झाडे नसताना शेकडो लिटर ताडी येते कुठून? जीवघेणे रसायन टाकून ताडीची निर्मिती केली जात आहे. यात परप्रांतीयांची मुजोरी वाढली असल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. पोलिस प्रशासनाने याचा कायमस्वरूपी बीमोड करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.















