सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, २४ जुलै रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन लाखापर्यत थकीत कर्ज असलेली पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
राज्य शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकेने महाआयटीद्वारे विकसित केलेल्या योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
















