Home टेक न्युज मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे

2
Reducing traffic congestion in Mumbai

स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बैठकीत दिले.

राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर आदी ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग सुविधा उपलब्ध असल्या तरी मुंबई परिसरात अधिकृत केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने असून त्यामध्ये सुमारे १५ लाख चारचाकी, ३० लाखांहून अधिक दुचाकी आणि ५ ते ६ लाख व्यावसायिक वाहने आहेत. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असून यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि रस्त्यांवरील ताण वाढत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्याचे निर्देश दिले. या केंद्रासाठी इच्छुक उद्योजकांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागविणे, मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया राबविणे तसेच परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई जिल्हाधिकारी आँचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.