देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आकाशवाणी, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नौसेना स्वरवंदना’ या संगीतमय कार्यक्रमाचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
‘वंदेमातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून नौदलाच्या पश्चिम कमांडच्या वाद्यवृंदाचे ६५ कलाकार एकत्रितपणे ही अनोखी स्वरवंदना साकारणार आहेत.
नौसेनेतील स्लो मार्च, क्विक मार्च संगीतासह काही देशभक्तीपर गीतांचा या कार्यक्रमात समावेश असून, नौसेनेच्या वाद्यवृंदाची लयबद्ध, सुरेल अनुभूती यातून प्रेक्षकांना निश्चितपणे मिळू शकेल.
मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या भव्य रंगमंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्तीच्या या सुरेल सोहळ्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
















