Home नंदुरबार जिल्हा भटक्या श्वान प्रजनन नियंत्रणासाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

भटक्या श्वान प्रजनन नियंत्रणासाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

2
One-day workshop on stray dog ​​breeding control concluded

माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद क्षेत्रात भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण क्षेत्रात प्राणी प्रजनन नियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबत मा. आयुक्त, पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र राज्य) यांनी दिलेल्या सूचनांनुसार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत प्राणी प्रजनन नियंत्रण विषयक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली असून, नव समाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, तळोदा रोड, नंदुरबार यांनी सहकार्य केले. सदर संस्था नंदुरबार नगरपरिषद कार्यक्षेत्रात नगरपरिषदेच्या नियंत्रणाखाली श्वान प्रजनन नियंत्रण केंद्र यशस्वीपणे चालवत आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील ३० पशुधन विकास अधिकारी सहभागी झाले. कार्यशाळेदरम्यान श्वान प्रजनन नियंत्रणासाठी आवश्यक शस्त्रक्रियांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये श्वान मादीमध्ये Pan Hysterectomy तसेच श्वान नरामध्ये Open Castration या शस्त्रक्रियांची प्रात्यक्षिके डॉ. हर्षवर्धन पाटील, पशुधन विकास अधिकारी, वडफळी (ता. अक्कलकुवा) यांच्या मार्फत सादर करण्यात आली.

या कार्यशाळेमुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना श्वान प्रजनन नियंत्रणाच्या आधुनिक व शास्त्रीय पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले असून, ग्रामीण व नागरी भागात भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

(Collector Office nandurbar)

#animalbirthcontrol#PublicHealth#AnimalWelfareMatters