नवी दिल्ली :दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला’ दिल्लीकर आणि मराठी बांधवांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. आपल्या मातीतील चवीबद्दलचा हाच जिव्हाळा जपण्यासाठी आता *पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा अनमोल ठेवा घेऊन ‘हुरडा पार्टी’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नवीन महाराष्ट्र सदन येथे हा आनंदसोहळा रंगणार आहे.
हुरडा पार्टी म्हणजे केवळ एक खाद्यभ्रमंती नसून तो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्सव आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रब्बी हंगामात जेव्हा ज्वारीची कणसे कोवळी आणि दुधाळ असतात, तेव्हा त्यांना शेतातच निखाऱ्यांवर भाजून जो आस्वाद घेतला जातो, तो अनुभव शब्दातीत असतो. हाच अस्सल ग्रामीण अनुभव आणि मातीचा उबदार सुगंध आता दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत अनुभवायला मिळणार आहे. या मेजवानीत गरमागरम हुरड्यासोबतच लसणाची झणझणीत चटणी, शेंगदाणा कूट, सुटा गूळ, ताजे दही आणि जोडीला बोरे, पेरू, ऊस व ओला हरभरा (घाटा) अशा अस्सल रानमेव्याचा आस्वाद घेता येईल.
धकाधकीच्या जीवनात आपण गावापासून दूर गेलो असलो, तरी आपले मन नेहमी शेताच्या बांधावरच रमत असते. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीला आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा देता यावा आणि नवीन पिढीला आपल्या वैभवशाली परंपरांची ओळख व्हावी, हा या आयोजनामागील मुख्य हेतू आहे. डिसेंबरमधील खाद्य महोत्सवाप्रमाणेच या हुरडा पार्टीलाही रसिक खवय्यांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कस्तुरबा गांधी मार्ग येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या सोहळ्यासाठी ९ ते ११ जानेवारी दरम्यान आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहा. *दिल्लीच्या गारव्यात महाराष्ट्राच्या मातीचा गोडवा चाखण्यासाठी आणि गप्पांच्या ओघात हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण निमंत्रित आहात.
महाराष्ट्राच्या या आदरातिथ्याचा आणि अस्सल चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.
चला तर मग, आपल्या संस्कृतीशी पुन्हा एकदा घट्ट नाते जोडूया आणि या हुरडा पार्टीचा आनंद द्विगुणित करूया!
















