Home शैक्षणिक राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

3
Call for applications for the Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship

मुंबई: देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाच्या सुधारित नियमानुसार, राज्यातील अनुसूचित जातीच्या (नवबौद्धांसह) दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मान्यता प्राप्त एआयआयएमएस, आयआयएम, आयआयटी, आयआयआयटीस, एन‌आयटी, आयआयएससी, आयआयएसइआर, इन्स्टीटयूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स तसेच अन्य नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत संबंधित शैक्षणिक संस्थांच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ‘ब’मध्ये नमूद शाखा व उपशाखांचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यात या संस्थांच्या नव्याने सुरू होणाऱ्या शाखा व उपशाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आयआयटी मधील प्रिपरेटरी कोर्स वगळता पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती लागू राहणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळासह सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावरून डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विहित मुदतीत समक्ष अथवा टपालाद्वारे सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.