
क्वांटम कॉम्पुटिंग आणि डीप टेक टेक्नॉलॉजीने संपूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. या तंत्रज्ञानाने केलेल्या अफाट वाढीशी, त्याच्या वेगाशी त्वरेने जुळवून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी परिपूर्ण अशी इकोसिस्टिम (परिसंस्था) निर्माण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावरील वाटा पुढील पाच वर्षांत सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. मानवी इतिहासात आपण यापूर्वी कधीही अशी गती आणि वाढ पाहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला या विकासाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग व्हावेच लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्सकडे (Frontier Technology Index) पाहताना भारत यामध्ये चांगली कामगिरी करतना दिसत आहे. आपण सध्या ३६ व्या क्रमांकावर असलो, तरी आपली गणना अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणारे म्हणून केली जात आहे.
मजबूत इकोसिस्टीम (परिसंस्था) अभावी आपण काळाच्या ओघात मागे पडू. विशेषतः उत्पादन क्षेत्रात आपली सर्वात मोठी ताकद असणारे आपले एमएसएमई उद्योग निधीची कमतरता आणि क्षमतांसह इतर अनेक गोष्टींच्या अभावामुळे या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकत नाहीत. सर्वांगीण विकासासाठी इकोसिस्टीम तयार करायची असेल, तर सर्वांना सहज उपलब्ध असणारे स्मार्ट सुविधा आणि प्लॅटफॉर्म्स निर्माण करावे लागतील. आणि या स्मार्ट व्यवसायांच्या गरजा पूर्ण करू शकणारे सक्षम मनुष्यबळ तयार करावे लागेल. महाराष्ट्राला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी, या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर सर्वसमावेशकता आणावी लागेल. केंद्र सरकारच्या क्वाँटम तंत्रज्ञानासंबंधीच्या योजना आधीच सुरू झाल्या आहेत. आपण आपल्या प्रयत्नांना केंद्राच्या या उपक्रमांशी सुसंगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाला या तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या संस्थेची गरज तीव्रतेने जाणवत आहे. ‘मित्रा’ या दिशेने विचार आणि काम करत आहे. अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी नवीन सुविधा आणि प्लॅटफॉर्म्सच्या बाबतीत शासन गुंतवणूक करण्यास पूर्णपणे तयार आहे. पुढील दोन तीन वर्षांत क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रात किमान पाच हजार लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय आहे. सध्या वेगवेगळ्या पातळीवर होत असलेले हे सर्व प्रयत्न एकत्र आणून त्यांचे संस्थात्मकीकरण केले जाऊ शकते. त्या दृष्टीने इंटरॅक्शन विथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉर्मेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटीयर टेक इन्स्टिट्यूट हा खरोखरच एक उत्तम उपक्रम आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, महाराष्ट्र राज्य ‘मित्रा’ चे दीपक करंजीकर, ॲलिकॉन कॅस्टलॉयचे हर्ष गुणे, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर, ॲक्टीन टेक्नॉलॉजीचे विकास महाजन, बिग्रेडीयर सचिन कालिया, स्टॅटरजिक रिसर्च ॲण्ड ग्रोथ फाऊंडेशनचे वरुण खंदारे, सिम्बॉयसिसच्या प्र. कुलगुरु डॉ. स्वाती मुजूमदार, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडिस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबणे, इंडियन इस्टिटयूट ऑफ सायन्स ॲण्ड रिसर्चचे प्रसन्नजीत फडणवीस, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, टाटा स्टिल लि. चे माजी उपाध्यक्ष सी. आर. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.















