
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचिती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी काढले.
घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित दहीहंडी उत्सव प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित सैन्य दलातील जवानांना भेटून संवाद साधला. कार्यक्रमास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.















