Home आरोग्य पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

1
District administration urges special care for health during the monsoon season.

गडचिरोली:- पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीतर्फे विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे* म्हणाले की, “पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये, कारण साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते. तसेच, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि नेहमी ताजे व गरम अन्न खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे”.

या मोहिमेच्या संदर्भात *मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे* यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत ताप अंगावर काढू नका. अनेकदा नागरिक घरगुती उपाय किंवा परस्पर औषधे (Self-medication) घेतात, जे धोकादायक ठरू शकते. सतत ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, उलट्या किंवा जुलाब होणे, सांधेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास कोणताही उशीर न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”.

*ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश:*

“पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर (TCL) वापरून नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामसेवक आणि सरपंचांनी पाणी साठवणुकीच्या स्रोतांची नियमित स्वच्छता राखावी, तसेच पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी (OT Test) करूनच गावकऱ्यांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करावा, अशा कडक सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.”

*नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना*

*डासांपासून संरक्षण* झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला आणि डास पळवून लावणारी क्रीम किंवा स्प्रेचा वापर करा.

*स्वच्छता:* घराबाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा. पावसाने भिजल्यास घरी आल्यावर अंघोळ करा. घरातील फरशी, भिंती, स्वयंपाकघर आणि शौचालय स्वच्छ ठेवा.

*पाणी शुद्धीकरण*

पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात पिण्याचे पाणी नेहमी उकळून, गाळून आणि पूर्णपणे शुद्ध करून घेणे, हा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाणी उकळल्यामुळे त्यातील हानिकारक जीवाणू व विषाणू नष्ट होतात, ज्यामुळे कॉलरा, टायफॉइड यांसारख्या गंभीर आजारांपासून प्रभावी संरक्षण मिळते. उकळलेले आणि शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरताना ते नेहमी स्वच्छ भांड्यात साठवून व्यवस्थित झाकून ठेवावे, जेणेकरून ते पुन्हा दूषित होणार नाही. शुद्ध आणि सुरक्षित पाणी पिणे हीच आरोग्यसंपन्न जीवनाची पहिली पायरी आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे

संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा आरोग्यविषयक मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा.

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.