(नंदुरबार) येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि मानाचा तुरा रोवला आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने एका 4 वर्षीय बालिकेच्या पोटातून दुर्मिळ कर्करोगाची गाठ यशस्वीरीत्या काढून तिला नवजीवन दिले आहे. नंदुरबारसारख्या दुर्गम भागात झालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्राकडून कौतुकास्पद ठरत असल्याची माहिती जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे
संबंधित 4 वर्षीय बालिकेला पोटात गाठ असल्याच्या तक्रारीसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिची सखोल वैद्यकीय तपासणी केली असता, तिला डाव्या मूत्रपिंडाचा ‘विल्म्स ट्यूमर’ (नेफ्रोब्लास्टोमा) हा बालवयात आढळणारा अत्यंत दुर्मिळ कर्करोग असल्याचे निदान झाले.
बालिकेची गंभीर स्थिती पाहता, महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेदरम्यान बालिकेचे डावे मूत्रपिंड संपूर्णपणे काढण्यात आले (Left Radical Nephrectomy). एवढेच नव्हे तर, ट्यूमरमुळे प्रभावित झालेला डायफ्रेंमचा (श्वासपटल) काही भाग देखील डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने काढून टाकला. शस्त्रक्रियेनंतर बालिकेला यशस्वीरित्या एक्स्ट्युबेट (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवरून दूर) करण्यात आले असून, सध्या ती बाल अतिदक्षता विभागात (PICU) तज्ज्ञांच्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. तुषार पाटील व त्यांच्या संपूर्ण शल्यचिकित्सा पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच, शस्त्रक्रियेदरम्यान उत्कृष्ट भूलसेवा प्रदान करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुबेदार, डॉ. योगेश बोरसे आणि त्यांच्या भूलतज्ज्ञ पथकाचेही कौतुक होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत परिचारिका कर्मचारी, ऑपरेशन थिएटरमधील कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समन्वय व तत्परता मोलाची ठरली.
“महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा विकसित होत आहेत. नंदुरबारसारख्या दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी संस्था कटिबद्ध आहे.” असेही महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
















