Home शेती 57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय’

57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय’

0
'Mahavistar AI' now in the pockets of 57 thousand farmers

अमरावती : आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. विभागाचे ‘महाविस्तार ॲप’ सध्या जिल्ह्यातील 57 हजारांहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल सोबती ठरत असून, याद्वारे शेतीविषयक सल्ल्यापासून ते बाजारभावापर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

‘महाविस्तार ॲप’ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, पारंपारिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी यात चॅटबॉटची सुविधा आहे. विशेष म्हणजे, पूर्वीची 10 प्रश्नांची मर्यादा आता वाढवून 20 प्रश्न करण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मातृभाषेतून संवाद साधू शकतात.

विविध बाजार समित्यांमधील शेतीमालाचे भाव तात्काळ कळत असल्याने शेतकऱ्यांना विक्रीचे निर्णय घेणे सोपे जात आहे. तसेच दररोजचा अचूक हवामान अंदाज यावर उपलब्ध आहे. खतांचे नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती या एकाच प्लॅटफॉर्मवर मिळते.

या ॲपमुळे शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढवण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. गुगल प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार एआय’ ॲप डाउनलोड करून डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.