
सातारा : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भाषाविषयक धोरण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मराठी भाषेची सक्ती असेल; मात्र इतर कोणत्याही भारतीय भाषेची सक्ती केली जाणार नाही. इतर भाषा ऐच्छिक असतील. यासंदर्भात अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, तिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मराठी साहित्य चळवळीचा आढावा घेत कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी साहित्य महामंडळ ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोदी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संमेलनाची सविस्तर माहिती दिली. साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.















