
नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे शांघाय (चीन) येथे दि. ३० जुलै ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या एशियन ज्युनियर जम्परोप स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील कु. भाव्या गोरख गवळी हिची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर तिचा सत्कार मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आला.
कु. भाव्या गवळी ही पी. जी. पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, मागील पाच वर्षांपासून ती जम्परोप खेळाचा नियमित सराव करत आहे. आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तिच्या क्रीडा कारकिर्दीत तिने जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल आठ वेळा सुवर्णपदके पटकावली आहेत. तसेच सहा राज्यस्तरीय ज्युनिअर जम्परोप अजिंक्यपद स्पर्धांमध्ये चार सुवर्णपदके व एक रौप्यपदक मिळविले असून, एका अन्य राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
राष्ट्रीय स्तरावरही तिने चार वेळा ज्युनिअर जम्परोप स्पर्धेत सहभाग घेत तीन सुवर्णपदके व एक रौप्यपदक प्राप्त करून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. आता तिची एशियन ज्युनियर जम्परोप स्पर्धेसाठी झालेली निवड ही नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
यावेळी पी. जी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. आनंद परदेशी तसेच खेळाडूचे मार्गदर्शक श्री. रामा हटकर यांचाही मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महेश पाटील व क्रीडा अधिकारी श्री. ओमकार जाधव उपस्थित होते.
नंदुरबारच्या कन्येने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत जिल्ह्याचा गौरव वाढविल्याबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
#Nandurbar#DrMittaliSethi#BhavyaGawali#AsianJuniorJumpRopeChampionship#Shanghai2026#JumpRopeIndia#NandurbarPride#SportsAchievement#YouthInSports#PGPublicSchool#DistrictSportsOffice#MaharashtraSports#ChampionOfNandurbar#InspiringYouth#NandurbarNews















