Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशा

नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशा

0
New direction of forest management in Nandurbar

लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील वनव्यवस्थापनाच्या नव्या मॉडेलची सुरुवात मानली जात आहे.

मा. आमदार श्री. आमश्या पाडवी, मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. उपविभागीय अधिकारी अनय नावंदर (आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, तळोदा) तसेच Indian School of Business, हैदराबाद येथील टीम यांच्या हस्ते सामूहिक वनक्षेत्रात फीत कापून बांबू व्यवस्थापन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते बांबू रोपांची लागवड करून शाश्वत व नियोजनबद्ध वनव्यवस्थापनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

महिलांच्या नेतृत्वातून वनसंपत्तीचा सक्षम वापर:

भारतात प्रथमच आदिवासी महिलांच्या वन उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामूहिक वनहक्क क्षेत्रातील बांबू विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सामूहिक वन संसाधन व्यवस्थापन समिती, लेघापाणी आणि तोरणादेवी वन उत्पादक कंपनी यांच्या समन्वयातून महिलांच्या नेतृत्वाखाली बांबू व्यवस्थापन व विक्री प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने लवकरच बांबू प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा मानस असून, त्याद्वारे स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

स्थलांतराला आळा – स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ:

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे. नियोजनबद्ध लागवड, महिला सहभाग, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील थेट प्रवेश या चार घटकांमुळे हा उपक्रम राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती:

कार्यक्रमास सरपंच, स्थानिक पदाधिकारी, सामूहिक वन व्यवस्थापन समिती सदस्य, वन विभागाचे प्रवीण निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कान्हा नाईक, दिनेश मराठे, रोहित खरात, रावेंद्रसिंग चंदेल, सामूहिक वन संसाधन समितीकडून जयसिंग चौधरी, देवसिंग चौधरी, गोरख चौधरी, जामरसिंग चौधरी तसेच तोरणादेवी वन उत्पादक कंपनीच्या निर्मला भील, फुलवंती पाडवी यांच्यासह Indian School of Business चे विशाल जाडकर, आर्यन गाडगीळ, गुणवंत पाटील उपस्थित होते.