Home नंदुरबार जिल्हा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या विश्वविक्रमी एकपात्री काव्यनाट्य अनुभवाचा ३१५० वा महोत्सवी प्रयोग...

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या विश्वविक्रमी एकपात्री काव्यनाट्य अनुभवाचा ३१५० वा महोत्सवी प्रयोग २० जुलै रोजी

0
The 3,150th celebratory performance of the world-record-holding one-person poetic drama experience, ‘Kutumba Ranglay Kavyat’, will be held on July 20.

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने मराठी काव्यपरंपरेचा अद्वितीय आविष्कार ठरलेला ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या विश्वविक्रमी जागतिक एकपात्री काव्यनाट्य अनुभवाचा ३१५० वा महोत्सवी प्रयोग सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

विश्वनाथ (विसुभाऊ) बापट हे गेल्या अनेक दशकांपासून मराठीतील विविध काव्यप्रकार रसिकांसमोर आगळ्यावेगळ्या शैलीत सादर करीत आहेत. कविता, गीत, भावस्पर्शी निवेदन आणि साभिनय सादरीकरण यांच्या सुरेख संगमातून त्यांनी मराठी काव्याचा समृद्ध वारसा घराघरांत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उपक्रमाने हजारो प्रयोगांचा टप्पा यशस्वीपणे पार करत जागतिक स्तरावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महोत्सवी प्रयोगामध्ये संतकाव्य, भावकाव्य, गीतकाव्य, गझल, चारोळ्या, देशभक्तीपर रचना, भक्तिगीते तसेच विविध काव्यप्रकारांचे गायन आणि साभिनय सादरीकरण यांचा अनोखा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. शब्द, स्वर आणि अभिनय यांचा सुरेख मिलाफ असलेला हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.

कार्यक्रमात तबला – पवित्र सावंत आणि तालवाद्य – डॉ. किशोर खुशाले यांची साथ लाभणार असून, त्यांच्या सुरेल व लयबद्ध साथसंगतीमुळे कार्यक्रमाची कलात्मक उंची अधिक खुलणार आहे. सदर कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, काव्यप्रेमी, साहित्यरसिक, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विश्वविक्रमी काव्यनाट्य अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.