
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक गरजांनुसार रोजगारक्षम व नाविन्यपूर्ण कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आज नाव्या (Nurturing Aspirations through Vocational Training for Young Adolescent Girls) योजना तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत खाणबाधित क्षेत्रातील ग्रामसभांसाठी वन रोपवाटिका निर्माते/व्यवस्थापक व ‘गैर-लाकूड वनउत्पादन संकलक’ या कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने करण्यात आले होते. त्यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इमरान शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक बानाइत प्रत्यक्ष व दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीमती मनीषा वर्मा पुढे म्हणाल्या की, आजच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये वाढत असून डिजिटल कौशल्य आत्मसात करणाऱ्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास करण्यात येत असून नियमित शिक्षणासोबतच अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. स्थानिक गरजेनुसार रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात उभ्या राहणाऱ्या मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होत असून भविष्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींमध्ये कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असे कौशल्य आत्मसात करून रोजगारक्षम होण्याची मोठी संधी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होत असून युवकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
*‘नाव्या’ योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी कौशल्य प्रशिक्षण*
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने PMKVY 4.0 अंतर्गत १६ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी नाव्या हा विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश किशोरवयीन मुलींना विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ‘डिजिटल मित्र’ व ‘सेल्फ एम्प्लॉइड टेलर’ हे दोन अभ्यासक्रम राबविण्यात येत असून सदर प्रशिक्षण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे देण्यात येणार आहे.
*खाणबाधित ग्रामसभांसाठी वनाधारित कौशल्य प्रशिक्षण*
याच कार्यक्रमात जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत खाणबाधित क्षेत्रातील ग्रामसभांना खाणबाधित क्षेत्रातील ग्रामसभांसाठी वन रोपवाटिका निर्माते/व्यवस्थापक व ‘गैर-लाकूड वनउत्पादन संकलक’ या दोन अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला ‘स्किल हब’ म्हणून विकसित करण्याच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील युवक-युवतींना प्रत्येकी १५० अशा एकूण ३०० उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (STRC) यांच्या माध्यमातून दिले जाणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या परिसरातच प्रशिक्षण मिळावे यासाठी एटापल्ली परिसरातील दुर्गम भागात ऑन-साईट व प्रत्यक्ष पद्धतीने प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अवधूत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संबंधीत प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील प्रशिक्षणोत्सुक युवक-युवती,तसेच ग्रामसभांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.















