
कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारासमोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.















