
एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार ज.मो.अभ्यंकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, मनीषा कायंदे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केले.
भारत हा युवकांचा देश आहे. भारताला कौशल्ययुक्त युवकांचा देश बनवले तर एकही देश भारतीय मनुष्यबळाशिवाय काम करू शकणार नाही आणि जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून भारत पुढे येईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांच्या कार्यगाथा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कोविडसारख्या कठीण काळात जग थांबले, पण शिक्षकांनी शिक्षण थांबू दिले नाही. ज्ञानदानाची अखंड धारा सुरू ठेवत त्यांनी समाजाला प्रेरणा दिली, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.















