Home महाराष्ट्र सनदशीर मार्गाने जगण्याची नवी सुरुवात करावी : जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले

सनदशीर मार्गाने जगण्याची नवी सुरुवात करावी : जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले

0
We should start a new life in a lawful way: District Collector Dr. Mangesh Gondavale

गोंदिया : सनदशीर मार्गाने जगण्याची नवीन सुरुवात करावी. ही नवीन पहाट पूर्वाश्रमीच्या नक्षलवादी यांच्या आयुष्यात आलेली असल्याने त्याचा पुरेपूर सकारात्मक उपयोग आयुष्यात करावा, असे आवाहन आज कायदेशीर समर्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 15 पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना आज जिल्हास्तरीय पडताळणी समिती समोर आत्मसमर्पण प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोंदावले बोलत होते. यावेळी समर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.

या छोटेखानी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त श्री. औटी, पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, नक्षल कक्षाचे पोलीस कर्मचारी आणि समर्पित नक्षलवादी या कार्यक्रमात उपस्थित होते.

हिंसेचा मार्ग सोडून सनदशीर मार्गाची कास समर्पित नक्षलवाद्यांनी धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोंदावले यांनी यावेळी केले. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्यावतीने समर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ व सुविधा पुरविण्यात येईल, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. या मिळालेल्या नवीन आयुष्यात नव्या जोमाने व नव्या उत्साहाने सुरुवात करावी अशा शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.

जिल्हा प्रशासनाकडून पुनर्वसन झालेल्या समर्पित नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. भामरे यावेळी म्हणाले. समर्पित नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासह त्यांचे मूलभूत कागदपत्रही तयार होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नक्षलवाद्यांसाठी असलेल्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनेचा पूर्ण लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले जाईल. याअंतर्गत घरकुल योजना लाभ, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण असे अनेक लाभ येत्या काळात मिळतील. बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. समर्पित नक्षलवाद्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह 14 स्त्री-पुरुष सहभागी होते.

समर्पित नक्षलवाद्यांनी तयार केलेली बांबूची कलाकृती जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. औटी यांना भेट म्हणून दिली.

यावेळी पोलीस हवालदार मुस्ताक सय्यद, लक्ष्मण घरत, सुरेंद्र हिचामी, अनिल कोरे, सुरेश चंद्रिकापुरे, माधुरी गजभिये, पोलीस नायक संजय कटरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई लीना मेश्राम, पोलीस शिपाई रमेश उईके, आशिष वंजारी, राजेश तावाडे, सुरेश मडावी, अतुल कोल्हटकर हे पोलीस कर्मचारी नक्षलवादी कक्षामध्ये कार्यरत असून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले ते कर्मचारीही आजच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

आज आत्मसमर्पण प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या पूर्वाश्रमीची नक्षलवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
अनंत ऊर्फ विकास नागपूरे, नागासू, रानो ऊर्फ रामे येशू नरोटे, संतु , रा. पाटनवाढवी, साँगता, रहि. राशीमेटा, प्रताप ऊर्फ समर, अनुजा, लाली ऊर्फ पुजा, दिनेश, रामको ऊर्फ शिला चमरु मडावी, रितु ऊर्फ अर्जुन भिमा दौड्डी, रोशन ऊर्फ मारा इरिया बेडजा, सुभाष ऊर्फ पोज्ना बंडी रख्या, रतन ऊर्फ मनकु कुम्मा पोयाम, अनुराधा.