Home महाराष्ट्र उमेद अभियानामुळे बेलगावातील महिलांना आर्थिक बळ !

उमेद अभियानामुळे बेलगावातील महिलांना आर्थिक बळ !

1
Women in Belgaum gain financial strength due to Umed campaign!

अहिल्यानगर:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बेलगाव येथील कष्टकरी महिलांनी झाडू निर्मितीचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. संघर्षावर मात करत या महिलांनी आपल्या संसाराला मोठे आर्थिक बळ दिले असून ग्रामीण भागातील इतर महिलांसाठी त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

पूर्वी या महिलांना झाडू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल कर्नाटकातून आणावा लागत असे. यात वाहतूक खर्चाचा मोठा बोजा पडायचा व भांडवलाअभावी कमी प्रमाणात माल खरेदी केल्याने नफा मर्यादित राहायचा. अशा संघर्षमय परिस्थितीत समुदाय संसाधन व्यक्ती अनिता जाधव यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे महिलांना उमेद अभियानाची माहिती मिळाली. यानंतर महिलांनी एकत्र येत लक्ष्मी व येडेश्वरी स्वयंसहायता गटांची स्थापना केली. येथून त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने एक नवी दिशा मिळाली.

व्यवसाय वाढवण्यासाठी गटांना बँकेकडून एक लाख व तीन लाखांचे कर्ज उपलब्ध झाले. तसेच ग्रामसंघातून मिळालेल्या समुदाय गुंतवणूक निधीमुळे त्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले. यातून पुढे अण्णा भाऊ साठे झाडू उत्पादक गट स्थापन करण्यात आला. या गटाला मिळालेल्या दोन लाखांच्या निधीतून व्यवसायाला मोठी गती मिळाली. आता या महिला मोठ्या प्रमाणावर कच्चा माल खरेदी करत असून यंत्रसामग्रीच्या साहाय्याने त्यांनी झाडू निर्मिती सुरू केली आहे.

यंत्राच्या वापरामुळे आता कमी वेळेत अधिक झाडू तयार होत असून महिला आपल्या कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा यशस्वीपणे भागवत आहेत. केवळ झाडू तयार न करता त्यांनी आपल्या आयुष्याची नवी वाट तयार केली असून त्यांच्या कष्टाला व जिद्दीला आता यशाची जोड मिळाली आहे. या संपूर्ण उपक्रमाला गटविकास अधिकारी सोनल शहा, प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक मंजूषा ठवकर, तालुका अभियान व्यवस्थापक फिरोज सय्यद व प्रभाग समन्वयक रूपाली झारगड यांचे मार्गदर्शन लाभले.

#UmedAbhiyan#MSRLM#WomenEmpowerment#LakhpatiDidi#RuralLivelihood#SelfHelpGroup#Entrepreneurship#BelgaonSuccess#FinancialIndependence#UmedMaharashtra#MicroFinance#SmallBusiness#Inspiration#अहिल्यानगर#उमेद#स्वयंसहायता_गट#स्वावलंबन#महिला_उद्योजिका#RuralIndia